यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी येथील आरटीओ चेकपोस्टवर गुजरात येथून आलेल्या एका ट्रकमध्ये १ कोटी ९ लाख रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित गुटखा आढळला असून, या प्रकरणी पांढरकवडा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
पांढरकवडा राष्ट्रीय महामार्गाने विक्रीसाठी प्रतिबंधित अवैध गुटखा वाहतूक होत असल्याचे समजल्यानंतर पिंपळखुटी आरटीओ चेकपोस्ट येथे वाहनांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी गुटख्यासह २५ लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला. या प्रकरणी अन्नसुरक्षा मानके कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजयकुमार वाढवे हे करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली अजयकुमार वाढवे, उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, नीलेश निमकर, रजनिकांत मडावी, नरेश राऊत आदींनी केली.
पोलिसांनी चेकपोस्टवर जीजे-२७-टीएफ-०५८२ या क्रमांकाचा ट्रक अडवला असता चालक घाबरलेला तसेच बिथरलेला दिसला. त्याची चौकशी केली असता तो गुजरातमधून आल्याचे व अख्तरभाई अहमद मिया शेख (वय ४७) असे त्याचे नाव असल्याचे समजले. तो गांधीनगर जिल्ह्यातील देहगम येथील आहे. त्याच्या वाहनाची तपासणी केली असता ट्रकमध्ये पांढऱ्या रंगाच्या विविध पोत्यात १ कोटी ९ लाख ३१ हजार रुपयांचा गुटखा आढळून आला.