विदर्भ

यवतमाळ : आशा स्वयंसेविकांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सरपंचाला कारावास

backup backup
यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा येथील सरपंचाने दोन आशा स्वयंसेविकांवर सत्तुराने हल्ला केला. त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशानेच हे वार करण्यात आले होते. या दोन्ही महिला थोडक्यात बचावल्या. ही घटना ७ जून, २०२१ रोजी भरदुपारी घडली. या गुन्ह्यातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायलयाने पाच वर्षे कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली.
मधुकर उर्फ मधुसुदन संभाजी मोहुर्ले असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ते सायतखर्डा येथील सरपंच आहेत. कोरोना महामारीच्या काळात आशा स्वयंसेविका गावागावात जाऊन आपले कर्तव्य बजावत होत्या. आरोपीची सुरुवातीपासून एका पीडितेवर वाईट नजर होती. तिला रस्त्यात अडवून त्याने तिचा विनयभंग केला होता. सतत नकार मिळत असल्याने आरोपी चिडून होता. कोरोना महामारीच्या काळात गावात आलेल्या आशा संपविण्याचा बेत आरोपीने आखला. दोन्ही महिला एक सारखाच स्कार्फ बांधून जात होत्या. यात आरोपीची गफलत झाली, त्याने दुसऱ्याच महिलेवर सत्तुराने वार केले. नंतर पीडितेवरही सत्तुराने वार करून पळ काढला.
या प्रकरणात दोन्ही जखमींच्या जबाबावरून घाटंजी पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा प्रयत्न, विनयभंग आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा संपूर्ण तपास उविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी केला. दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिती लऊळकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सरकारी वकील मंगेश गंगलवार यांनी एकूण ८ साक्षीदार तपासले. त्यामध्ये दोन्ही जखमी महिला, तपास अधिकारी, उपचार करणारे डॉक्टर, गुन्ह्यातील परिस्थिती जन्य पुरावे न्यायालयाने ग्राह्य मानले. त्यावरून आरोपीला कलम ३०७ मध्ये पाच वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत १ वर्षे कारावास व दंड अशी शिक्षा ठोठावली. आरोपीला दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. या खटल्यात सरकारी वकील यांना पैरवी अधिकारी गजानन शेजुळकर यांनी सहकार्य केले.
SCROLL FOR NEXT