यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : एका दुचाकी चालकाच्या बॅगेत ५०० रुपयांच्या चार लाख ८२ हजारांच्या ९६४ बनावट नोटा सापडल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री पुसद-वाशिम रोडवरील मारवाडी फाटा येथे नाकाबंदी करून ही कारवाई केली. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी सांगितले.
पुसद येथील एक जण खऱ्या नोटांच्या मोबदल्यात ५०० रुपयांच्या पाचपट नोटा विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री संबंधित व्यक्ती वाशिम येथून मारवाडी फाटामार्गे पुसद येथे जाणार असल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारवाडी फाटा येथे नाकाबंदी केली. यावेळी वाहने थांबवून तपासणी करण्यात येत होती. त्याचवेळी मोपेडवरून एक व्यक्ती आली. पथकाने त्याला थांबवून त्याचे नाव विचारले असता, त्याने विशाल नागोराव पवार (३४, रा. खामनवाडी, पोस्ट कासोळा, ता. महागाव, ह. मु. धनराज फर्निचर, गांधीनगर, पुसद) असे सांगितले. या व्यक्तीची तसेच त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता, त्याच्याकडे ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. पथकाने त्याला ताब्यात घेत तो भाड्याने राहत असलेल्या घराची झडती घेतली. तेथे ५०० रुपयांच्या ९६४ बोगस नोटा सापडल्या. पथकाने विशालकडील मोपेडही जप्त केली आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक पंकज अतुलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि. अमोल सांगळे, पोलिस उपनिरीक्षक सागर भारस्कर, पोलिस हवालदार सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, सोहेल मिर्झा, मोहंमद ताज, सुनील पंडागळे, दिगंबर गीते आदींच्या पथकाने केली. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने गुन्ह्यात सहभागी इतर आरोपींच्या शोधात स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, पोलिसांनी विनोद गंगाराम राठोड (४२, रा. सुभाष वाॅर्ड, पुसद) आणि बालू बाबूराव कांबळे (४६, रा. परळी वैजनाथ, जि. बीड) या दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे या प्रकरणी सखोल चौकशी केली जात आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.