नागपूर, पुढारी वृत्तसेवा : ओबीसी विद्यार्थ्यांसाठीही आता 'स्वाधार' सारखी योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.२९) विधानसभेत केली.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी किमान पाच वसतिगृह सुरू व्हावेत यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून लवकरच ते सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी विधानसभेत दिली. अडीच वर्षांत तुम्हाला वसतिगृहे का सुरू करता आली नाहीत? असा सवालही त्यांनी विरोधकांना केला. विधानसभेत विदर्भातील विकासाच्या प्रश्नांवर आणि इतर मुद्यांवर चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.
फडणवीस म्हणाले, ३६ जिल्ह्यातील २१,६०० विद्यार्थ्यांच्या राहण्याचा, जेवणाचा आणि शिक्षणाचा खर्च त्यांच्या बँक खात्यात डिबीटीअंतर्गत जमा केला जाणार आहे. ओबीसी, मराठा विद्यार्थ्यांसोबतच आता आदिवासी विदयार्थ्यांना देखील फेलोशीपसाठी सरकार सहकार्य करणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. ही वसतिगृह खासगी व्यक्तींना नव्हे तर ते स्वयंसेवी संस्थांना चालवायला दिले जाणार असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
समृद्धीप्रमाणे आता नागपूर ते गोवा महामार्ग आपण बांधत आहोत. याचा सर्वात मोठा लाभ मराठवाड्याला मिळणार आहे. समृद्धी महामार्गापासून वंचित मराठवाड्यातील सारे जिल्हे यात जोडले जाणार आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या दृष्टीने शेतीशी संबंधित अनेक कंपन्या स्थापन करण्यात येणार असून यासाठी ३ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. ५२२० गावात नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना तयार केली असून ४ हजार कोटी रुपयांचा पहिला टप्पा झाल्यावर दुसऱ्या टप्प्यासाठी आता ६ हजार कोटी वर्ल्ड बँक देणार असल्याचे त्यांनी सांगितले.