नागपूर: पुढारी वृत्तसेवा : 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत विशेषत: सीमा आंदोलनादरम्यान आंदोलकांच्या तोंडी होते. नागपूरचे कवी राजा बढे यांनी लिहिलेले संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत शाहीर अमीर साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजाने अजरामर केले. राज्य सरकारने या गीताला राज्यगीत म्हणून आज (दि.३१) मंजुरी दिली. यामुळे नागपूरकर गीतकार राजा बढे (Raja Badhe) आणि पर्यायाने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या गीताचे कवी असलेले नागपूरकर राजा बढे (Raja Badhe) यांची संपादक, चित्रपट निर्माते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक अशी चतुरस्त्र ओळख आहे. तरीही त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. सीमा आंदोलन व संघर्षाच्या काळात त्यांचे हेच गीत मराठी मनांना संघर्षाची प्रेरणा देणारे ठरले.
नागपुरात तुळशीबाग येथील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. नागपुरात जन्मलेल्या राजा बढे यांचे माध्यमिक शिक्षण नागपुरातील टिळक विद्यालयात झाले आहे. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात पत्रकारितेने झाली. त्यानंतर बरीच वर्षे त्यांनी आकाशवाणीला सेवा दिल्यावर त्यांनी चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. "स्वानंद चित्र' ही संस्था उभी केली आणि 'रायगडचा राजबंदी' हा संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट त्यांनी काढला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे राजा बढे यांचे दैवत होते. त्यांची असंख्य गीते गाजली. त्यापैकी पन्नासच्या दशकातील त्यांचे 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत गायक शाहीर साबळे यांनी अजरामर केले. राजा बढे यांच्या नावे १८ कवितासंग्रह, ४ नाटके, ९ संगीतिका, ५ एकांकिका, एक कादंबरी आहे. शिवाय त्यांनी प्रसिद्ध साहित्याचे भावानुवाद देखील केलेले आहेत.
हेही वाचलंत का ?