वाशिम, पुढारी वृत्तसेवा : शेतीमध्ये हिस्सा आणि पैसे देत नसल्यामुळे संतापलेल्या मुलाने आपल्या ७० वर्षांच्या वडिलांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. रिसोड तालुक्यातील वाडी वाकद परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. भगवानबाबा संस्थान इथे वास्तव्यास असणाऱ्या आत्माराम मुंढे यांच्यासोबत त्यांचा मुलगा संजय मुंढे यांचं काल रात्री शेतीमधील हिस्सा आणि पैसे देण्यावरून भांडण झालं. बाप आणि मुलामधला वाद कुटुंबातील सदस्यांनी सोडवला.
मात्र संजय मुंढेच्या डोक्यात राग घुसलेला असल्याने त्याने भगवानबाबा मंदिर परिसरामध्ये झोपलेल्या वडिलांवर तीक्ष्ण वस्तूने वार करून हत्या केली. वडिलांची हत्या केल्यानंतर मुलगा संजय मुंढे गावातून पळून गेला होता, मात्र रिसोड पोलिसांनी त्याला पकडले.संजय मुंढेनेच वडिलांची हत्या केल्याचा दाट संशय पोलिसांना असल्यामुळे त्यांनी डॉग स्कॉडच्या साहाय्याने तपास केला, तेव्हा कुत्र्याने संजय मुंढेला ओळखलं, त्यामुळे रिसोड पोलिसांनी संजय मुंढे या आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत.