MP Sanjay Deshmukh Pudhari
वाशिम

MP Sanjay Deshmukh | खा. संजय देशमुख 'नॉट रिचेबल': बैठकीला दांडी मारल्याने 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा

'ऑपरेशन टायगर'च्या या कथित मोहिमेत खासदार देशमुख यांचे नाव आघाडीवर

पुढारी वृत्तसेवा

Yavatmal Washim MP Operation Tiger Maharashtra

अजय ढवळे

वाशीम : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय देशमुख हे सध्या 'नॉट रिचेबल' असल्याने आणि ते पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा बदलाचे वारे वाहत असल्याची चर्चा आहे.

आगामी १९ जून रोजी शिवसेनेच्या स्थापनेला ६० वर्षे आणि २२ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकसंध शिवसेना फोडल्याच्या ऐतिहासिक घटनेला चार वर्षे पूर्ण होत असतानाच, ठाकरे गटाला पुन्हा एकदा खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या या कथित मोहिमेत यवतमाळ वाशीमचे खासदार संजय देशमुख यांचे नाव सर्वात वर असल्याची चर्चा दोन्ही शिवसेनेत आहे.

ठाकरे गटाचे ९ पैकी तब्बल ७ खासदार फुटणार आणि ते शिंदे गटात सामील होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून दिल्ली ते गल्ली सुरू आहे. शिंदे गटाचे सध्या ७ खासदार असून, ठाकरे गटाचे आणखी ७ खासदार फोडून ही संख्या १४ वर नेण्याची आणि केंद्रातील भाजप सरकारला भक्कम पाठिंबा देण्याची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीतील एका 'स्नेहभोजनाला' ठाकरे गटाच्या खासदारांनी लावलेली हजेरी या संशयाला बळ देणारी ठरली.

या स्नेहभोजनात यवतमाळ वाशीमचे खासदार संजय देशमुख हे सुद्धा सहभागी झाले होते, असे सांगितले जाते. याच फुटीच्या भीतीने धास्तावलेल्या उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला प्रत्यक्षात फक्त अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे हे चारच खासदार उपस्थित राहिले. उरलेल्या पाच खासदारांनी या बैठकीला प्रत्यक्ष हजेरी न लावता ऑनलाइन हजेरी लावल्याने 'मातोश्री'ची धाकधूक वाढली आहे.या अनुपस्थित खासदारांमध्ये यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख यांच्या नावाभोवती संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे.

संजय देशमुख सध्या बाहेरगावी असून ते कोणाच्याही संपर्कात नसल्याचे, म्हणजेच 'नॉट रिचेबल' असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, त्यांच्या स्वीय सचिवाने सारवासारव करत, 'खासदार साहेबांच्या मुलीचे लग्नकार्य असल्याने ते त्यात व्यस्त आहेत आणि ते बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते,' असा दावा केला आहे. मात्र, ते सध्या कुठे आहेत? हे आम्हालाही माहित नसल्याचे या सचिवाने सांगितले. तर, प्रस्तुत प्रतिनिधीने खासदार देशमुख यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रत्येकवेळी 'नॉट रिचेबल' असाच संदेश आला. राजकीय विश्लेषकांच्या मते, संजय देशमुख यांच्याबद्दलची ही शंका उगाच निर्माण झालेली नाही.

प्रत्येक राजकीय वळणावर 'पार्टी बदलण्याची' आणि सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाण्याची त्यांची जुनीच सवय असल्याची टीका त्यांच्या विरोधकांनी केली आहे. आधी अपक्ष, नंतर शिवसेना, त्यानंतर काँग्रेस, परत भाजप आणि आता पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करून खासदारकी मिळवणे, हा त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत लवचिक राहिला आहे. प्रत्येक वेळी राजकीय फायदा पाहून निष्ठा बदलण्याच्या त्यांच्या याच इतिहासामुळे, 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत शिंदे गटाकडून होणाऱ्या संभाव्य खेळीत संजय देशमुख हे सर्वात आधी 'सॉफ्ट टार्गेट' ठरू शकतात, अशी चर्चा यवतमाळ आणि मुंबईच्या राजकीय गोटात रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT