वाशिम : कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे २७-२८ डिसेंबर दरम्यान मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे. असे आवाहन केलं आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शीत लहर एसओपी तयार करण्यात आलेली आहे.
जिल्हयातील सर्व क्षेत्रीय यंत्रणा यांना मुख्यालयी उपस्थित राहणेबाबत सुचना करण्यात आलेली आहे. विज पडून होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी काय करावे? व काय करु नये? याबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. वादळी पावसामुळे झालेल्या झाडांचे नुकसान, फांदया तुटणे, वाहतुकीचा रस्ता पुर्ववत सुरु करणे यासाठी अग्निशमन विभागाचे एक पथक तयार ठेवण्यात आलेले आहे. जिल्हयात अवकाळी पावसामुळे पूर परिस्थीती निर्माण झाल्यास त्याप्रसंगी तात्काळ बचाव कार्य करण्यासाठी जिल्हा शोध व बचाव पथक तयार ठेवण्यात आलेले आहे.
जिल्हयात सद्यपरिस्थीतीत ग्रामीण भागात कापूस वेचनीला आला आहे. त्यामुळे त्याचे नुकसान होऊ नये यासाठी शेतक-यांनी शेतात असलेले कापणीला आलेले पिक काढुन घ्यावे. अवकाळी पाऊस तसेच थंडीची लाट, नैसर्गिक विज यामुळे होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुका नियंत्रण कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष हे २४ तास सुरु ठेवण्यात आले आहे.
तरी याबाबत वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बुवनेश्वरी एस. भा.प्र.से. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशीम यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.