वाशिम

युवकाच्या तत्परतेने मायलेकाला मिळाले जीवदान

पुढारी वृत्तसेवा

अजय ढवळे

वाशीम: रस्त्यावर भीषण अपघात होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मायलेकासाठी मंगरूळपीर येथील रोहित कुलकर्णी हे खऱ्या अर्थाने 'देवदूत' ठरले आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता रोहित यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या दोघांनाही जीवदान मिळाले असून, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रोहित कुलकर्णी हे त्यांच्या मित्राच्या मदतीसाठी आपल्या चारचाकीने जात होते. दरम्यान, समोरून जाणाऱ्या एका दुचाकीसमोर अचानक माकड आडवे आल्याने दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील मायलेक गंभीर जखमी झाले.

वेळेची किंमत ओळखून धावले मदतीला

अपघात पाहताच रोहित यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमींना स्वतःच्या कारमध्ये घेतले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने कारंजा येथील डॉ. मोरे यांच्या रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने या मायलेकांचे प्राण वाचले आहेत. "जखमींना रुग्णालयात पोहचवून सर्व जबाबदारी पार पाडल्यानंतर रोहित पुन्हा आपल्या मित्राच्या मदतीसाठी रवाना झाले. त्यांच्या या निस्वार्थी कृतीने समाजापुढे माणुसकीचा नवा आदर्श ठेवला आहे."

अभियानातून मिळाली प्रेरणा

वाशिम जिल्ह्यातील सर्वधर्म मित्र मंडळाच्या “वन सेकंड वन कॉल – न्यू लाईफ” या अभियानातून रोहित यांनी प्रेरणा घेतली होती. या अभियानाचा मुख्य उद्देशच संकटात सापडलेल्यांना त्वरित मदत करणे हा आहे. रोहित कुलकर्णी यांनी दाखवलेल्या या शौर्यामुळे 'माणुसकी अजूनही जिवंत आहे' असा सकारात्मक संदेश समाजात गेला आहे. त्यांच्या या धाडसाचे आणि समयसूचकतेचे जिल्ह्यात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT