Thar crash Washim  Pudhari
वाशिम

Washim Accident | वाशिम शहरात ‘थार’चा थरार: ७ वाहनांना चिरडले; ४ जण गंभीर जखमी

बालाजी मंदिर परिसरात भीषण अपघाताने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली

पुढारी वृत्तसेवा

Thar crash Washim

वाशिम : शहरातील बालाजी मंदिर परिसरात शनिवारी (दि.१८) दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. भरधाव वेगात धावणाऱ्या ‘थार’ जीपने अचानक नियंत्रण गमावल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तसेच समोरून येणाऱ्या सुमारे पाच ते सात वाहनांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास बालाजी मंदिराच्या मागील रस्त्यावरून ही जीप अत्यंत वेगाने जात होती. चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि काही क्षणांतच जीपने समोर येणाऱ्या दुचाकींसह रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना एकामागोमाग एक धडक देत अक्षरशः धुमाकूळ घातला. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. मोठा आवाज झाल्याने नागरिक तत्काळ घटनास्थळी धावले. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. प्राथमिक तपासात भरधाव वेग आणि चालकाचे नियंत्रण सुटणे हे अपघातामागील मुख्य कारण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT