Shiv Sena UBT pudhari photo
वाशिम

Washim Shiv Sena Protest | शेतकऱ्यांना सरसकट एक लाखाची मदत द्या; अन्यथा ३० ऑक्टोबरला समृद्धी महामार्ग रोखणार

पाच हजारांची मदत तुटपुंजी असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप; वनोजा–शेलूबाजार येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Washim Samruddhi Expressway Rasta Roko

वाशीम : अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांना सरसकट एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. या मागणीसाठी येत्या ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा–शेलूबाजार येथे समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांचा सहभाग असलेले हे आंदोलन ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे यांनी व्यक्त केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, पश्चिम विदर्भ संपर्कनेते खासदार अरविंद सावंत आणि वाशीम–यवतमाळ लोकसभा संपर्कप्रमुख दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शिवसेना उपनेते आमदार नितीन बापू देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत पुरेशी नसल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे. शासनाच्या मदतीच्या घोषणेचा निषेधही यावेळी नोंदविण्यात येणार आहे.

या आंदोलनात पश्चिम विदर्भातील शेतकरी, शेतमजूर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा दावा वानखेडे यांनी केला. शिवसेनेचे जिल्हा, विधानसभा, तालुका आणि शहर पदाधिकारी, सर्कल प्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना, आरोग्य सेना आणि वाहतूक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT