Washim Death Threats
वाशीम: वाशीम शहर परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्याच सावत्र वडिलांनी विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वाशीम शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर रोजी संशयित व्यक्तीने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, पैसे देण्यास नकार मिळाल्यानंतर घरात अभ्यास करत असलेल्या आपल्या १६ वर्षीय सावत्र मुलीशी त्याने अयोग्य वर्तन करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून आई धावून आली. तिने संबंधित कृत्याचा विरोध केला असता संशयित आरोपीने तिला लाकडी काठीने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच अश्लील शिवीगाळ करून आई आणि दोन्ही मुलींना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर तो घटनास्थळावरून निघून गेला.
घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने वाशीम शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पोक्सो कायद्यातील संबंधित कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. वाशीम शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.