वाशिम : शिवणी गावात होऊ घातलेला १६ वर्षीय बालिकेचा बालविवाह प्रशासनाच्या तात्काळ व समन्वयित कारवाईमुळे वेळेत रोखण्यात आला. सदर प्रकरणाबाबत चाईल्ड लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. माहिती मिळताच संबंधित बालिकेच्या वयाची तातडीने खातरजमा करण्यात आली.
यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे, परिविक्षा अधिकारी गणेश ठाकरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाची स्थापना करण्यात आली. क्षेत्रीय कार्यकर्ता एकनाथ राठोड व जिल्हा प्रकल्प सहाय्यक (एव्हीए, नीती आयोग) नीलिमा भोंगाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बालिका व तिच्या पालकांचे समुपदेशन केले.
समुपदेशनादरम्यान बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत होणाऱ्या कायदेशीर कारवाईची माहिती, अल्पवयीन विवाहामुळे होणारे आरोग्यविषयक धोके तसेच मुलीच्या शिक्षण व भवितव्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर मुलीचे वय पूर्ण १८ वर्षे होईपर्यंत विवाह करणार नाही, असे पालकांकडून लेखी हमीपत्र घेण्यात आले. त्यामुळे होऊ घातलेला बालविवाह यशस्वीरित्या रोखण्यात आला.
महिला व बाल विकास विभाग व चाईल्ड लाईन १०९८ यांच्या सतर्कतेमुळे एका बालिकेचे बालपण व भविष्य सुरक्षित झाले आहे. जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी बालविवाह होत असल्यास तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे यांनी केले आहे.