वाशिम - वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनेवर जरब बसविणारा ऐतिहासिक निकाल दिला आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय - ३ वाशिम एम. एस. सहस्त्रबुद्धे यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावत पीडीतेला न्याय दिला आहे.
पंचशील नगरमधील विजय उर्फ भोलाराम बरखाम ह्या आरोपीने पीडितेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. या घटनेने वाशिम हादरले होते. ह्या प्रकरणात आरोपीने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. ह्याप्रकरणी वाशिम पोलीस स्टेशनला ३४३/२०२४ नुसार तक्रार दाखल झाली होती. तत्कालीन तपास अधिकारी एपीआय श्रीदेवी पाटील यांनी तपास करून न्यायालयात विशेष बाल खटला क्रमांक ५०/२०२४ नुसार प्रकरण न्यायप्रविष्ट केले.
तपास यंत्रणेचे पुरावे व पिडीतेची बाजू प्रभावीपणे मांडत सरकारी अभियोक्ता माधुरी मिसर (व्यास) यांनी प्रकरणाची क्रुरता व दाहकता न्यायालयासमोर आणली. सर्व तपासातील पुरावेअंती जिल्हा व सत्र न्यायाधीश -३ एम. एस. सहस्त्रबुद्धे यांनी आरोपीच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त करीत समाजात महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर संदेश देण्याची गरज अधोरेखित केली. ह्या निकालात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलम ६ नुसार गंभीर लैंगिक अत्याचारासाठी आजन्म कारावासाची शिक्षा आणि वीस हजार रुपये दंड (दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद) तसेच भांदवी कलम ३६३ नुसार ५ वर्षे कारावासाचे शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना साधी कैद) ची शिक्षा सुनावली.
ह्या महत्त्वाच्या खटल्यात तपास अधिकारी एपीआय श्रीदेवी पाटील यांनी बारकाईने तपास करून ठोस पुरावे जमा केले. सरकारी अभियोक्ता माधुरी मिसर (व्यास) यांनी शासनाची बाजू प्रभावीपणे मांडत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. कोर्ट पैरवी म्हणून पी.सी. सतीश बांगर यांनी काम पाहिले.