समृद्धी महामार्ग रोखणाऱ्या ठाकरे गटाच्या आंदोलनाला वाशिम जिल्ह्यात संघर्षाचे स्वरूप आले.  Pudhari
वाशिम

Washim Shivsena UBT Protest | समृद्धी महामार्गावर तणाव! आमदार नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज

शेतकऱ्यांना एक लाखांची मदत देण्यासाठी ठाकरे गट आक्रमक; महामार्ग रोखल्याने पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट; वनोजात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

Washim Samruddhi Expressway Shiv sena UBT Protest

वाशिम : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखणाऱ्या ठाकरे गटाच्या आंदोलनाला वाशिम जिल्ह्यात संघर्षाचे स्वरूप आले. वनोजा परिसरात महामार्गावर उतरून वाहतूक रोखणारे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या समर्थकांना हटवताना पोलिसांशी जोरदार झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी आमदार देशमुख यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाच हजारांची मदत अपुरी; एक लाखांची मागणी

अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची मदत अत्यंत अपुरी असल्याची भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करत आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारण्यात आले.

परवानगी नाकारली, तरी महामार्गावर आंदोलन

वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथे समृद्धी महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, त्यानंतरही आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी महामार्गावर उतरून वाहतूक रोखली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

आंदोलकांना महामार्गावरून हटवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की आणि झटापट झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या कारवाईनंतर आंदोलकांनी शासन आणि पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त केली.

आमदार नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात

महामार्गावरील आंदोलनादरम्यान पोलिसांनी आमदार नितीन देशमुख यांच्यासह अन्य आंदोलकांवर कारवाई केली. देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

दीड हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. वनोजा परिसरासह समृद्धी महामार्गावर तब्बल दीड हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोठ्या पोलीस बंदोबस्तानंतरही आंदोलनादरम्यान संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली.

दरम्यान, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख रुपयांची मदत देण्याच्या मागणीवरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतल्याने या आंदोलनाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न आणि आंदोलनादरम्यान झालेली पोलिसांची कारवाई यामुळे वाशिममधील राजकीय वातावरण तापले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT