समृद्धी महामार्गावर दरोडे टाकणाऱ्या आंतरजिल्हा पाच जणांच्या टोळीला कारंजा शहर पोलिसांनी अटक केली  Pudhari
वाशिम

Samruddhi Mahamarg Robbery | समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; पाच जण अटकेत

आरोपींकडून रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले वाहन, दोन बनावट पिस्तुले व पाच मोबाईल असा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Washim Samruddhi Expressway Crime

वाशीम : समृद्धी महामार्गावर प्रवाशांना लक्ष्य करून दरोडे टाकणाऱ्या आंतरजिल्हा पाच जणांच्या टोळीला कारंजा शहर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने जेरबंद केले आहे. आरोपींकडून रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले वाहन, लोखंडी रॉड, दोन बनावट पिस्तुले व पाच मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारंजा शहर पोलीस ठाण्यात २७ जुलै रोजी बिहारमधील पटणा जिल्ह्यातील बेलद रिटोला येथील रहिवासी तथा बँक व्यवस्थापक प्रशांत युधिष्ठिर रंजन (वय ३८) यांनी फिर्याद दिली. ते त्यांच्या (क्रमांक GJ-05 RJ-0407) या कारने समृद्धी महामार्गावरून रायपूरकडे जात होते. पहाटे तीनच्या सुमारास कारंजा (जि. वाशीम) परिसरात थकवा जाणवल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून विश्रांती घेत असताना चार अनोळखी व्यक्तींनी तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोख ५ हजार रुपये, दोन ग्रॅम सोन्याचे कानातील आणि अन्य रोख रक्कम असा सुमारे १५ हजार रुपयांचा ऐवज लुटला.

या प्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८९/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांची संयुक्त पथके तयार करून तपासाचे आदेश दिले.

तपासादरम्यान अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती संकलित करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जालना परिसरातील काही सराईत गुन्हेगार समृद्धी महामार्गावर दरोडे व डिझेल चोरीचे गुन्हे करत असल्याचे समोर आले. त्यानुसार भैया ऊर्फ हर्षद पांडुरंग साबळे (वय २६, रा. गजानन नगर, चिखली, जि. बुलढाणा) याला ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने साथीदारांची नावे उघड केली. त्यानंतर पोलिसांनी चेतन संजय माने (२५), ओम सुरेश सपकाळ (२०), धनंजय उजालसिंग कमळीकर (२५) आणि गोपाल श्रीकिशन मोरे (२६) या सर्वांना अटक केली. चौकशीत त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपींकडून ४ हजार ७५० रुपये रोख, एमएच-१४ डीएन-१२१३ क्रमांकाची ह्युंदाई व्हर्ना कार, लोखंडी रॉड, दोन बनावट पिस्तुले आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर (मंगरुळपीर) व मनीष ठाकरे (कारंजा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक अमर चोरे तसेच त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT