वाशिम

समृद्धी महामार्गावर मनसेचा राडा; कंत्राटदाराला पोलिसांसमोरच दिला चोप...

Washim news | या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील कामकाजाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

पुढारी वृत्तसेवा

वाशीम : समृद्धी महामार्गावरील कामाचा निकृष्ट दर्जा आणि प्रवाशांच्या असुविधांकडे होणारे दुर्लक्ष, या कारणावरून कारंजा लाड येथे मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी (७ एप्रिल) जोरदार राडा घातला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू किडसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी थेट कंत्राटदारावर हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

समृद्धी महामार्गावरील कामाची गुणवत्ता आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सुख-सोयींबाबत स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींकडे कंत्राटदार आणि प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याच संतापातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कारंजा लाड परिसरात कंत्राटदाराला गाठले. विशेष म्हणजे, पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

आक्रमक झालेले मनसे पदाधिकारी

या आंदोलनात राजू किडसे पाटील यांच्यासह अमोल लुलेकर (जिल्हाध्यक्ष, वाहतूक सेना), गजानन वैरागडे (जिल्हा सचिव), कपिल महाजन (शहराध्यक्ष, कारंजा), उमेश टोलमारे (उपजिल्हाध्यक्ष, वाशीम) आतिश डहाळे (उपजिल्हाध्यक्ष, मालेगाव-रिसोड) आदी पदाधिकारी सहभागी होते.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने हा उद्रेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या समोरच कंत्राटदाराला मारहाण झाल्याने समृद्धी महामार्गावरील सुरक्षा आणि प्रशासकीय वचक यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. "लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या निकृष्ट कामाची तक्रार करूनही दखल घेतली जात नसेल, तर मनसे स्टाईलने जाब विचारला जाईल," असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील कामकाजाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोषींवर आणि निष्काळजी कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT