Washim Robbery 
वाशिम

Washim Robbery | निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरावरच दरोडा....!

कारंजा येथील भरवस्तीतील मेमन कॉलनीतील प्रकार, 17 लाखांची धाडसी चोरी

पुढारी वृत्तसेवा

वाशीमः ज्यांनी आयुष्यभर कायद्याचे रक्षण केले आणि गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले, त्यांच्याच घरात शिरून चोरट्यांनी धुमाकूळ घालावा, यापेक्षा दुर्दैवी आणि संतापजनक बाब दुसरी कोणती असू शकते?

कारंजा येथील मेमन कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या घरावर धाडसी चोरी करत १७ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. भरवस्तीत आणि पोलीस अधिकाऱ्याच्या घरात झालेली ही घटना म्हणजे गुन्हेगारांनी थेट पोलीस प्रशासनाच्या 'खाक्या'ला दिलेले खुले आव्हानच आहे.

मुंबई पोलीस दलातून निरीक्षक पदावरून निवृत्त झालेले जमील रहीम शेख (५८) हे आपल्या कुटुंबासह मेमन कॉलनीत वास्तव्यास आहेत. २ मे च्या रात्री, जेव्हा संपूर्ण शहर निद्राधीन होते, तेव्हा अज्ञात गुन्हेगारांनी त्यांच्या घराची कडी उचकटून आत प्रवेश केला. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, घरातील सदस्य शेजारच्याच खोलीत गाढ झोपेत असताना, चोरट्यांनी दुसऱ्या खोलीत कपाटाचे लॉकर फोडून सोन्या-नाण्यावर हात साफ केला.

१७ लाखांची लूट; संसाराची पुंजी लंपास

१० तोळे सोन्याचे दागिने, नेकलेस सेट, अंगठ्या, सोन्याची चैन आणि रोख ६० हजार रुपये असा एकूण १७.३० लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

तपासाचे चक्र फिरले; पण गुन्हेगार कधी गजाआड?

घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके तैनात केली असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. आता कारंजा पोलीस या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून आपला दरारा पुन्हा निर्माण करतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT