Washim Revenue Department Strike
वाशिम : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत वाशिम जिल्ह्यातील महसूल तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना तसेच जिल्हा वाहन चालक संघटना २१ एप्रिलपासून बेमुदत संपात सहभागी झाल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने १६ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनानुसार, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तातडीने लागू करणे, केरळ सरकारच्या धर्तीवर कॅशलेस उपचार सुविधा देणे, विभागीय सेवा प्रवेश सुधारणा करणे तसेच रिक्त पदे लवकरात लवकर भरणे या प्रमुख मागण्या शासनाकडे करण्यात आल्या होत्या.
मात्र, या मागण्यांवर शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न घेतल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. यापूर्वी संपाची पूर्वसूचना देऊनही दखल न घेतल्याने अखेर बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनांनी स्पष्ट केले.
या संपामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. परिणामी तहसील कार्यालये, महसूल शाखा आणि प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शासनाने तातडीने चर्चा करून मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे.