धारदार तलवारी, खंजीरसह दोघांना अटक 
वाशिम

Washim Crime : धारदार तलवारी, खंजीरसह दोघांना अटक; वाशिम पोलिसांची मोठी कारवाई

पोलिसांच्या सतर्कतेमुळे घातपाताचा कट उधळला

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांविरुद्ध कडक मोहीम राबवण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने वाशिम शहरातील नंदिकेश्वर मंदिर परिसरात बुधवारी (दि.२९) छापा टाकून दोन तरुणांना दोन धारदार तलवारी आणि एका खंजीरासह रंगेहाथ अटक केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरात होणारा संभाव्य घातपात टळला आहे.

अक्षय गजानन वानखेडे (वय २६) व जयराम चव्हाण (वय १८, दोन्ही रा. नंदिकेश्वर मंदीराचे पाठीमागे पाटणी चौक वाशिम) अशी आरोपींची नावे आहेत. नंदिकेश्वर मंदिर परिसरात दोन तरूण एका पांढऱ्या रंगाच्या गोणीत शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये दोन लोखंडी धारधार तलवारी मिळून आल्या. तसेच त्यामधील एक तरूणाच्या कंबरेला एक खंजीर मिळून आले. दोघांवर वाशिम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT