दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ४ मोटारसायकली जप्त केल्या Pudhari
वाशिम

Washim Police | वाशिम पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांच्या टोळीला ठोकल्या बेड्या

चार मोटारसायकली जप्त; स्थानिक गुन्हे शाखेने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून आरोपींना घेतले ताब्यात.

पुढारी वृत्तसेवा

Bike Theft Gang Arrested

वाशिम : वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोटारसायकल चोरीच्या सत्राला लगाम लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

असा लागला तपासाचा धागा

२४ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, दुचाकी चोरीतील एक संशयित तोंडगाव (ता. जि. वाशिम) येथे आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जगदीश बांगर आणि त्यांच्या पथकाने तात्काळ तोंडगाव येथे सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने शेतशिवारात पाठलाग करून त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली

ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आदर्श जीवन कांबळे (रा. तोंडगाव) असे आहे. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपला साथीदार श्रेयस गणेश पाचपिल्ले (रा. खामगाव जीन, वाशिम) याच्या मदतीने शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 'होन्डा युनिकॉर्न' दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने शोध घेत श्रेयस पाचपिल्ले याला वाशिम-काटा रोडवर अडवून ताब्यात घेतले.

हिंगोली-वाशिम जिल्ह्यातून दुचाकी लंपास

दोन्ही आरोपींनी मिळून वाशिम जिल्ह्यातील शिरपूर, रिठद आणि शेजारील हिंगोली जिल्ह्यातील माळशेलू येथून मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी या कारवाईत चोरीच्या ३ आणि गुन्ह्यात वापरलेली १, अशा एकूण ४ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी शिरपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

या पथकाने केली कामगिरी

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि जगदीश बांगर व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. जिल्ह्यात चोरी गेलेल्या आणखी काही दुचाकी मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT