PLFS Survey  Pudhari
वाशिम

PLFS Survey 2026 | आवर्ती श्रमशक्ती सर्वेक्षण : रोजगार-बेरोजगारीची अचूक माहिती मिळणार

आवर्ती श्रमशक्ती सर्वेक्षण २०२६ साठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Unemployment statistics Maharashtra

वाशिम : भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत आवर्ती श्रमशक्ती सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. ग्रामीण व नागरी भागात हे प्रत्यक्ष क्षेत्रीय काम हाती घेण्यात आले असून, रोजगार व बेरोजगारी संदर्भातील अचूक आकडेवारी संकलित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणाद्वारे देशातील श्रमशक्ती, लोकसंख्येच्या तुलनेतील कामगारांचे प्रमाण, रोजगार-बेरोजगारीची स्थिती, शिक्षण व तांत्रिक शिक्षण घेतलेल्यांचे प्रमाण, शिक्षणातील गळतीची कारणे तसेच शेती, उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्रातील रोजगार स्थिती याबाबत सविस्तर माहिती गोळा केली जाणार आहे.

संकलित माहितीद्वारे कामगार शक्ती सहभाग दर, कामगार लोकसंख्या प्रमाण व बेरोजगारी दर यांसारखे महत्त्वाचे निर्देशक निश्चित करण्यात येणार असून, राज्य व केंद्र शासनाच्या धोरणनिर्मिती, योजना आखणी व अंमलबजावणीसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. ग्रामीण व शहरी भागांसाठी वयोगट, लिंग व शिक्षणाच्या पातळीनुसार स्वतंत्र वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

जिल्ह्यात हे सर्वेक्षण जिल्हा सांख्यिकी कार्यालय, वाशिम मार्फत राबविण्यात येत आहे. नमुना पद्धतीने निवडलेल्या गावांमध्ये व शहरातील ठराविक प्रभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करतील. कुटुंबांकडून घेतलेली सर्व माहिती पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येणार असून ती कोणत्याही अन्य शासकीय किंवा खाजगी संस्थेला देण्यात येणार नाही, याची खात्री प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कुटुंब प्रमुखांची भेट आवश्यक असल्याने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना रविवार व सुट्टीच्या दिवशीही काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्र. उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, वाशिम अ. बा. रेठे यांनी केले आहे.

सर्वेक्षणासंदर्भात अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०७२५२-२३४६६९ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT