वाशिम : जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी साठ्याबाबत चिंता वाढू लागली आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांची पातळी झपाट्याने खालावत असून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि जलसंधारण विभागाच्या एकूण १६० लघू तसेच ३ मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी केवळ ५० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
वाशिम तालुक्यातील एकबुर्जी आणि मालेगाव तालुक्यातील सोनल या मध्यम प्रकल्पांमध्ये सुमारे ४७ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडून प्रकल्प भरले होते. मात्र रब्बी हंगामातील लागवड क्षेत्र वाढल्याने सिंचनासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे , प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.