पावणेतीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक  
वाशिम

Washim News : पावणेतीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

चिमुकली आईच्या स्वाधीन; वाशीम पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

वाशीम: वाशीम येथून अपहरण झालेल्या पावणेतीन वर्षांच्या चिमुरडीची वाशीम पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत सुखरूप सुटका केली. मोबाईलचा वापर न करता पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी 'अहिल्यानगर ते थेट झारखंड' असा थरारक पाठलाग करून गुरूवारी (दि.९) बेड्या ठोकल्या. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चिमुरडीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले असून, चिमुकलीला बघितल्यानंतर आईच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले.

राम लांडकर या आरोपीने पुसद नाका (वाशीम) येथून चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर २४ मार्च रोजी आई संध्या संतोष पंडित (रा. उकळीपेन, ता. जि. वाशीम) यांनी तक्रार दाखल केली होती. घटनेचे गाभीर्य ओळखून वाशिम पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

आरोपी राम लांडकर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर आधीच चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो ओळख लपवण्यात पटाईत होता. सर्वात मोठे आव्हान म्हणजे तो कोणत्याही मोबाईलचा वापर करत नव्हता. त्यामुळे त्याचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.तरी पोलिसांनी गुप्त खबऱ्यांची मदत घेत आरोपीचा शोध घेतला.

सुरूवातीला आरोपी अहिल्यानगर परिसरातील पिंपळगाव पिसा येथे एका पोल्ट्री फार्मवर लपला होता. मात्र, पोलिसांचा सुगावा लागण्यापूर्वीच तो मुलीसह थेट झारखंडला पसार झाला. वाशीम पोलिसांनी तात्काळ झारखंड गाठून तिथे एक आठवडा तळ ठोकला, परंतु पोलिसांची कुणकुण लागताच आरोपी तिथूनही राजगड भागात पळाला. अखेर, तो पुन्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी भागात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खडकी परिसरातील प्रत्येक शेत आणि गोठा पिंजून काढत, एका केटर्सच्या शेडमधून आरोपीला रंगेहात पकडले आणि चिमुरडीची सुखरूप सुटका केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT