Washim News | १० वी–१२ वी परीक्षेतील गैरप्रकार भोवला : वाशिम जिल्ह्यात २२ शिक्षक-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई 
वाशिम

Washim News | १० वी–१२ वी परीक्षेतील गैरप्रकार भोवला : वाशिम जिल्ह्यात २२ शिक्षक - कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!

शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद वाशिम मंगल धुपे-गायलेवाड यांनी दिली माहिती

पुढारी वृत्तसेवा

वाशिम, दि.५:(पुढारी वृत्तसेवा ) जिल्ह्यात १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या १० वी व १२ वीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांबाबत संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत २२ जणांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद वाशिम मंगल धुपे-गायलेवाड यांनी दिली आहे.

या संदर्भात शिक्षण आयुक्त यांनी दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना दूरध्वनीद्वारे परीक्षा काळात गैरप्रकार करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्राद्वारेही संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात गुन्हे नोंद असलेल्या ५१ शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी संबंधित शिक्षण संस्थांना कळविण्यात आले होते.

त्यापैकी श्री संत ज्ञानेश्वर ज्ञानप्रसारक मंडळ अंतर्गत श्री. मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जुमडा येथील १० अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ७ स्वयंअर्थसहायित तत्वावरील शिक्षकांना संस्थेकडून निलंबित करण्यात आले आहे. तसेच मातोश्री बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, मांगवाडी अंतर्गत माऊली विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मोहजा येथील ५ स्वयंअर्थसहायित शाळेतील शिक्षकांनाही निलंबित करण्यात आले आहे.

अशा प्रकारे एकूण ५१ गुन्हे नोंद असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी २२ कर्मचाऱ्यांना संबंधित संस्थांनी निलंबित केले असून उर्वरित प्रकरणांबाबत पुढील कार्यवाही सुरू असल्याचेही माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे-गायकवाड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT