वाशिम : जिल्ह्याला 'बीड' जिल्ह्याप्रमाणे भ्रष्टाचार आणि मनमानी कारभारापासून वाचवावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या कामांसाठी पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींचे स्वीय सहाय्यक (PA) आणि कार्यकर्ते ठेकेदारांवर दबाव आणून नियमबाह्य पद्धतीने कामे मिळवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष अनंतकुमार काळे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे.
निवेदनानुसार, जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्याच्या विकासासाठी मंजूर केलेल्या निधीचा वापर मनमानी पद्धतीने केला जात आहे. पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींचे जवळचे लोक शासकीय नियमांना बगल देऊन आपल्या मर्जीतील एजन्सी आणि कंत्राटदारांना कामे देत आहेत. ई-टेंडरिंग प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून, शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने कामे दिली जात आहेत. विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, सर्व नगर परिषद, नगर पंचायत आणि महावितरणमध्ये हे प्रकार सर्रास घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महावितरणच्या कामांमध्ये तर हे प्रकार अधिकच वाढले आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना कामे देण्याचा नियम असताना, काही मोजक्याच व्यक्तींना, ज्यांचे लोकप्रतिनिधींशी संबंध आहेत, त्यांनाच कामे दिली जात आहेत. यामुळे कामाचा दर्जा खालावत असून, अप्रशिक्षित लोकांकडून कामे करून घेतली जात आहेत.
अनंतकुमार काळे यांनी म्हटले आहे की, हा 'बीड पॅटर्न' गेल्या ६ महिन्यांपासून वाशिम जिल्ह्यात फोफावत आहे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. तसेच, भ्रष्टाचारी प्रवृत्तींविरोधात न्यायालयात आणि ACB (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) व CBIकडे (केंद्रीय अन्वेषण विभाग) तक्रारी दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांनी वाशिम जिल्ह्याला 'बीड' किंवा 'बिहार'सारखे होण्यापासून वाचवण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे.