Washim Municipal Council Encroachment Removal  Pudhari
वाशिम

Washim Encroachment | वाशीम नगरपरिषदेचा अतिक्रमणांवर हातोडा; प्रमुख रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

नागरिकांकडून स्वागत: अनधिकृत शेड, टपऱ्या तसेच रस्त्यांवर अडथळा निर्माण करणारे साहित्य हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळे

पुढारी वृत्तसेवा

Washim Municipal Council Encroachment Removal

वाशीम : शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या तसेच सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांविरोधात वाशीम नगरपरिषद प्रशासनाने बुधवारी (दि.५) धडक कारवाई सुरू केली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शहरातील विविध भागांतील अतिक्रमणे हटविण्यात आल्याने प्रमुख मार्ग मोकळे झाले असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत बस स्टॉप रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दिघेवाडी शाळा परिसर, पोस्ट ऑफिस परिसर तसेच शिवाजी स्कूल परिसरातील सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणांवर जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. अनधिकृत शेड, टपऱ्या तसेच रस्त्यांवर अडथळा निर्माण करणारे साहित्य हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळे करण्यात आले.

या कारवाईदरम्यान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, नगराध्यक्ष अनिल केंदळे, अतिक्रमण अधिकारी अमित घुले, अग्निशमन विभागाचे पथक, पोलीस प्रशासनाचे अधिकारी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. विविध विभागांच्या समन्वयातून संपूर्ण कारवाई शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.

शहर अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने ही मोहीम आगामी काळातही टप्प्याटप्प्याने सुरू राहणार असून सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.

या कारवाईमुळे शहरातील प्रमुख रस्ते मोकळे झाल्याने वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांनी नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे स्वागत करत अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT