Malegaon Taluka Farm Laborer Death Pudhari
वाशिम

Washim Farmer Death | दिवाळी पाडव्याच्या रात्री शेतमजुराने गळफास घेऊन जीवन संपविले

मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील ओंकार नीवालकर यांनी मुलीच्या लग्नाचे कर्ज आणि रोजगाराअभावी आर्थिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

Malegaon Taluka Farm Laborer Death

वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजापासून जवळच असलेल्या एरंडा येथे एका शेतमजुराने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली. ओंकार नीवालकर (वय अंदाजे ५५) असे मृत शेतमजुराचे नाव आहे. दिवाळी पाडव्याच्या रात्री १० नोव्हेंबर रोजी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार नीवालकर हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, परिसरात रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मागील वर्षी त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते. या लग्नासाठी घेतलेले कर्ज अद्याप फेडता आले नव्हते. त्यातच यंदा हाताला काम नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला होता. या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

शेतमजुरांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न

सततची नापिकी आणि शेतीतील आर्थिक अडचणींमुळे शेतकरी आधीच संकटात आहेत. त्याचा परिणाम शेतमजुरांवरही होत असून, अनेकांना नियमित रोजगार मिळत नसल्याचे चित्र आहे. गावपातळीवर रोजगाराच्या संधींचा अभाव आणि शासकीय योजनांतून पुरेसे काम उपलब्ध होत नसल्याने शेतमजूर कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट बनत आहे. ओंकार नीवालकर यांच्या मृत्यूमुळे ग्रामीण भागातील शेतमजुरांच्या रोजगाराचा आणि आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा

ओंकार नीवालकर यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती सरपंच तथा समाजसेवक राजू सांगळे यांनी दिली. या दुर्दैवी घटनेमुळे एरंडा गावावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT