Karanja Manglurpir road Ganja seized
वाशिम : वाशिम जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत 12 किलो गांजा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ही कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले.
रविवारी (दि. 19) रात्री वाशिम पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, दोन व्यक्ती कारंजा येथून मंगरुळपीरकडे मोटारसायकलवरून गांजा घेऊन येत आहेत. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी (स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम) यांनी तात्काळ दोन पथके तयार करून कारंजा परिसरात रवाना केली.
एक पथक मंगरुळपीर रोडवरील वाडा फाटा येथे तैनात करण्यात आले, तर दुसरे पथक कारंजा-मंगरुळपीर रोडवर गस्त घालत होते. रात्री सुमारे 1.30 वाजता गस्तीदरम्यान दोन जण मोटारसायकलवर मंगरुळपीरकडे जात असल्याचे दिसले. त्यांच्या बॅगमध्ये काही संशयास्पद वस्तू असल्याचे दिसल्याने पोलिसांनी वाडी फाट्यावर तैनात पथकाला माहिती दिली.
दोन्ही पथकांनी समन्वय साधत संशयितांचा पाठलाग केला. पोलिसांना समोर पाहताच संशयितांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच मोटारसायकल अडवून दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांच्या बॅगेत सुमारे 12 किलो गांजा सापडला. संशयितांची नावे ज्ञानेश्वर दयाराम मुखमले (वय 25, रा. गोगरी, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम) आणि कृष्ण उर्फ कुणाल गजानन पुसाडे (वय 21, रा. शेलू बाजार, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम) अशी आहेत.
जप्त केलेल्या गांज्याची किंमत रु. 1,20,000 असून जप्त मोटारसायकलची किंमत रु. 70,000 इतकी आहे. एकूण रु. 1,90,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मंगरुळपीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि योगेश धोत्रे, पोउपनि शेखर मास्कर, पोहवा गजानन अवगळे, आशिष बिडवे, राहुल व्यवहारे, पोअंम भुषण ठाकरे, तुषार ठाकरे, राजकुमार यादव, शुभम चौधरी, अविनाश वाढे, गोपाल चौधरी, चालक सुनिल तायडे आणि संदिप डाखोरे यांनी केली .
जिल्ह्यात कोणी अवैध गांज्याची विक्री करत असल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्ष, वाशिम येथे माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.