Washim Illegal Liquor Transport
वाशिम : वाशिम शहरातील बालाजी मंदिर परिसरात कारमधून अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले असून, टाटा नेक्सॉन कार आणि देशी-विदेशी दारूच्या ११ पेट्यांसह एकूण ६ लाख ४९ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजी मंदिर परिसरात एका चारचाकी वाहनातून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून संशयित टाटा नेक्सॉन कार अडवली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी आणि विदेशी दारूच्या एकूण ११ पेट्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ४९ हजार ४४० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईत बालाजी निंबाजी मोटे (वय ३८, रा. जयपूर, ता. जि. वाशिम) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या टाटा नेक्सॉन कारची अंदाजे किंमत सहा लाख रुपये असून, दारूसह एकूण ६ लाख ४९ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कार मदन जयस्वाल (रा. जयपूर, वाशिम) यांच्या मालकीची असल्याची प्राथमिक माहिती आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार, पोलीस उपनिरीक्षक देविदास झुंगे तसेच पोलीस अंमलदार हरिभाऊ कालापाड, स्वप्निल शेळके आणि समाधान शृंगारे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.