वाशिम : एकीकडे संपूर्ण कुटुंब नव्या पाहुण्याच्या आगमनाची वाट पाहत असताना, दुसरीकडे जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कथित निष्काळजीपणामुळे एका बाळाचा जन्मापूर्वीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वाशिममध्ये घडली आहे. पळसखेड (ता. रिसोड) येथील गव्हाणे कुटुंबाने हा गंभीर आरोप केला असून, संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लता नामदेव गव्हाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची सून शिवानी वैभव गव्हाणे यांना प्रसूतीसाठी २ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर सर्व अहवाल नॉर्मल असल्याचे सांगत, सकाळी १० वाजेपर्यंत नैसर्गिक प्रसूती होईल, असे रुग्णालयाने कळवले होते. मात्र, सकाळ उलटून गेली तरी शिवानी यांना तीव्र वेदना होत होत्या. कुटुंबीयांनी तब्बल १४ तास, म्हणजेच पहाटे ३ पासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांना वारंवार विनंती केली, परंतु कोणीही रुग्णाकडे फिरकले नाही, असा गंभीर आरोप गव्हाणे यांनी केला आहे.
सायंकाळी ५ वाजता जेव्हा रुग्णाची तपासणी करण्यात आली, तेव्हा प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. त्यानंतर प्रसूतीसाठी रुग्णावर अमानुषपणे दबाव टाकण्यात आला, असे तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये रुग्णाच्या गालावर मारहाण करणे, पोटावर चुकीच्या आणि धोकादायक पद्धतीने दाब देणे आणि वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्तींकडून उपचार करून घेणे, अशा धक्कादायक बाबींचा समावेश आहे. या वागणुकीचे व्रण आजही रुग्णाच्या शरीरावर असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अखेरीस सायंकाळी ५:३० वाजता प्रसूती झाली, मात्र बाळाच्या हृदयात ठोके नसल्याचे सांगत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या संपूर्ण प्रकाराला रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार धरत गव्हाणे कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे खालील मागण्या केल्या आहेत:
दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तातडीने दाखल करावा.
पहाटे ३ ते सायंकाळी ५ या वेळेत कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी.
वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्तींनी रुग्णाला का हाताळले, याची सखोल चौकशी व्हावी.
भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत.
या घटनेमुळे केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नाही, तर जिल्हा आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. "वेळेवर उपचार मिळाले असते, तर कदाचित आमचे बाळ वाचले असते," ही भावना कुटुंबीयांना चटका लावून जात आहे. आता जिल्हा प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी किती तत्परता दाखवते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.