वाशीम: हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार 4 दिवस पूर्व विदर्भात पाऊसाचा जोर कायम राहणार आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यानुसार वाशीम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून ठिकठिकाणी सततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ग्रामीण भागात नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून शेतशिवारात पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या पाऊसामुळे कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांच्या शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच परतीच्या पावसाच्या भीतीने त्रस्त असलेले शेतकरी आता सततधार पावसामुळे हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतातील बांध फुटले असून पिके पाण्याखाली गेली आहेत. या पावसामुळे वाहतुकीत देखील अडथळे निर्माण होत आहेत.
जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तात्पुरता तुटला आहे. काही पुलांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गावागावात घरात पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी तात्पुरता वीजपुरवठाही खंडित झाला असून अंधारामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदी-नाल्यांजवळ नागरिकांनी जाणे टाळावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.