Gutkha seizure 
वाशिम

Gutkha seizure washim : वाशिममध्ये ४ लाखांच्या सुगंधित गुटख्यासह मालवाहू गाडी जप्त

ठाणेदार श्रीदेवी पाटील यांच्या पथकाची १ ऑगस्टला कारवाई

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) महाराष्ट्रात गुटखा माफियांविरुद्ध 'मकोका' (MCOCA) सारखा कठोर कायदा लागू करण्याचे आदेश दिल्यानंतर, वाशिम ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. रिसोडकडून वाशिमच्या दिशेने येणाऱ्या एका मालवाहू ट्रकमधून बेकायदेशीरपणे वाहून नेला जाणारा तब्बल ४ लाख रुपये किमतीचा सुगंधी गुटखा पोलिसांनी रंगेहात पकडला आहे. ट्रकला जप्त करून एकूण ८ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

ही कारवाई १ ऑगस्ट रोजी दुपारी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांच्या पथकाने ग्रामीण हद्दीत केली आहे . गुप्त माहितीच्या आधारे वाशिम ग्रामीण पोलिसांच्या पथकाने रिसोडकडून वाशिम कडे येणाऱ्या एका संशयास्पद मालवाहू ट्रकला थांबवून पाहणी केली. वाहनाची तपासणी केली असता, त्यात अन्न आणि औषध प्रशासनाने बंदी घातलेला मोठा गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत , अंदाजे ४ लाख रुपये किमतीचा बंदी असलेला गुटखा जप्त केला. याशिवाय तस्करीसाठी वापरलेले ४ लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन असा एकूण ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या धडक कारवाईबद्दल अधिक माहिती देताना वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार श्रीमती श्रीदेवी पाटील यांनी सांगितले की, "अवैध गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आणि कठोर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाला (FDA) तात्काळ कळवण्यात आले आहे." सध्या या प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, "हा माल नेमका कोणाचा होता? कुठे पुरवला जाणार होता? आणि यामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे?" या दिशेने वाशिम ग्रामीण पोलीस अत्यंत बारकाईने तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT