Washim Substandard Dairy Products
वाशिम : नागरिकांच्या आरोग्याशी निगडित दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर भूमिका घेतली आहे. वाशिम शहरातील रेणुका फूड्स आणि माँ चामुंडा दूध डेअरी येथून घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी खोवा, तूप आणि पनीर हे पदार्थ निर्धारित गुणवत्तामानकांनुसार निकृष्ट (Sub-standard) आढळले आहेत. याप्रकरणी संबंधित अन्न व्यवसाय चालकांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित मानकांनुसार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने वाशिम शहरात दुग्धजन्य पदार्थांची तपासणी व नमुना संकलन मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेदरम्यान रेणुका फूड्स येथून तीन, तर माँ चामुंडा दूध डेअरी येथून दोन नमुने घेण्यात आले. हे सर्व पाच नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
प्रयोगशाळेच्या अहवालानुसार रेणुका फूड्स येथील खोवा व तूप तसेच माँ चामुंडा दूध डेअरी येथील पनीरच्या नमुन्यांमध्ये निर्धारित गुणवत्तामानकांमध्ये तफावत आढळली. त्यामुळे हे नमुने ‘निकृष्ट’ अर्थात ‘Sub-standard’ घोषित करण्यात आले आहेत.
तपासणीदरम्यान तूप आणि पनीरच्या नमुन्यांमध्ये BR (Butyro-Refractometer) Reading निर्धारित मर्यादेपेक्षा किंचित अधिक असल्याचे आढळले. तसेच खोव्याच्या नमुन्यात Milk Fat on Dry Matter चे प्रमाण निर्धारित मानकापेक्षा कमी असल्याचे प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट झाले आहे.
अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित अन्न व्यवसाय चालकांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच त्याअंतर्गत लागू नियम व विनियमांनुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा थेट संबंध नागरिकांच्या आरोग्याशी असल्याने त्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. बाजारात विक्री होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी तपासणी व नमुना संकलनाची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.