Swadhar Scheme Deadline Extended
वाशिम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे वृत्त दि. २९ सप्टेंबररोजी 'दै. ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनेच्या ऑनलाइन अर्जाची मुदत वाढविली आहे.
यापूर्वी संबंधित विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी दि. ३० सप्टेंबर २०२६पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज सादर करताना अडथळे येत होते. त्यामुळे मुदतवाढ मिळावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.
दरम्यान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई तसेच समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता व्यावसायिक अभ्यासक्रमातील (Professional Course) प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाचा ऑनलाइन अर्ज सादर करण्यास दि. १ ऑक्टोबर २०२६ ते दि. १० ऑक्टोबर २०२६पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
स्वाधार योजनेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींचा मुद्दा ‘दैनिक पुढारी’ने ठळकपणे मांडला होता. विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नसल्याने निर्माण झालेला संभ्रम आणि त्यातून होणारे संभाव्य शैक्षणिक नुकसान याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर आता मुदतवाढ जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वाशिमचे सहायक आयुक्त, समाज कल्याण पियुष चव्हाण यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटनुसार, कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने शासकीय वसतिगृहासाठी आपले अर्ज विहित वेळेत नोंदवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला असला, तरी ऑनलाइन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी पूर्णपणे दूर होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पात्र विद्यार्थी केवळ तांत्रिक कारणामुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांच्या अडचणीला ‘पुढारी’ने दिलेला आवाज आणि त्यानंतर झालेली प्रशासनाची दखल यामुळे स्वाधार योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.