वाशिम

Washim Crime : धक्कादायक! चिमुकल्याचा वापर करून कापड दुकानात चोरी; वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने महिलेला ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : गर्दीचा फायदा घेत आणि स्वतःच्या लहान मुलाचा आधार घेऊन हातसफाई करणाऱ्या एका महिला चोराला वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत शिताफीने अटक केली आहे. मानोरा येथील एका कापड दुकानात भरदिवसा चोरी करून पसार झालेल्या या महिलेकडून चोरीची ४४ हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. रोहिणी उर्फ शीतल भास्कर शिंदे (वय २५, रा. नालंदा नगर, वाशिम) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिला पुढील कारवाईसाठी मानोरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?

मानोरा येथील रहिवासी सुरेखा शालीक लिंबोळे या २३ मार्च रोजी 'चुन्नू मुन्नू' कापड दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी संशयित महिलेने गर्दीचा फायदा घेत सुरेखा यांच्या जवळील पर्समधून ४४ हजार रुपये रोख आणि एक मोबाईल लंपास केला. चोरी झाल्याचे लक्षात येताच मानोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुलाला समोर करून करायची चोरी

तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित महिला बाजारपेठेत किंवा गर्दीच्या ठिकाणी आपल्या लहान मुलाला पुढे करून नागरिकांचे लक्ष विचलित करत असे. नागरिक मुलाकडे बघण्यात गुंतले की, योग्य संधी साधून ती पर्स किंवा मौल्यवान वस्तू चोरून पसार व्हायची. गेल्या काही दिवसांपासून मानोरा परिसरात अशा चोरीच्या तक्रारी वाढल्याने पोलिसांनी हा तपास गांभीर्याने घेतला होता.

सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने सापळा

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी तत्परता दाखवत तातडीने पथक तयार केले. शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित महिला वाशिमच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. एलसीबीच्या पथकाने वाशिम शहरात कसून शोध सुरू केला असता, सिव्हिल लाईन परिसरात संशयित महिला दिसून आली. महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली.

पोलिसांची यशस्वी कामगिरी

जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि योगेश धोत्रे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या महिलेने अजून कुठे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT