वाशिम

Washim Crime | जावयाचा संशयास्पद मृत्यू , घातपाताच्या संशयावरून तिघे ताब्यात....

पुढारी वृत्तसेवा

वाशीम : मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकळवाडी येथे एका २९ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घातपाताचा बळकट संशय व्यक्त केला जात असून, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) प्रमुख सुधाकर आढे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत समांतर तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

सुरेश राजाराम झळके (वय २९, रा. अमानी, ता. मालेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुरेशची वाकळवाडी येथे सासरवाडी असून, गुरुवारी (३० जुलै) सकाळी ८ वाजेच्या सुमारास वाकळवाडी येथील शेतशिवारात त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण मालेगाव तालुक्यात तीव्र खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच मेडशी चौकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद इंगळे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पोलीस उपविभागीय अधिकारी पवार आणि पोलीस निरीक्षक राजेश खेरडे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

दरम्यान, या घटनेमागे हत्येचा कट असण्याची शक्यता लक्षात घेता वाशिम LCB प्रमुख सुधाकर आढे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तत्काळ सूत्रे हाती घेतली आहेत. स्थानिक पोलिसांसोबतच LCB चे पथकही या प्रकरणात समांतर तपास करत असून, संशयास्पद हालचाली आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाचा मार्ग निश्चित केला जात आहे.

पोलीस व LCB च्या संयुक्त कारवाईतून या प्रकरणी आतापर्यंत तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सुरेशचा मृत्यू नेमका कसा झाला आणि यामागे कोणती कारणे आहेत, याचा शोध घेण्यासाठी LCB प्रमुख सुधाकर आढे व त्यांचे पथक कसून चौकशी करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT