वाशिम

Washim crime | महामार्गाच्या मुरुम भराईत आढळले मानवी शरीराचे तुकडे, वाशिममध्ये खळबळ...

पुढारी वृत्तसेवा

अजय ढवळे

वाशिम : वाशिम-हिंगोली महामार्गावर सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात मंगळवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार उघडकीस आला. रस्त्याच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या मुरुमाच्या ढिगाऱ्यात मानवी शरीराचे अवयव आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना १७ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास स्थानिक बाजार समिती ते डम्पिंग ग्राऊंड दरम्यान उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाच्या कामासाठी कंत्राटदाराने बोराळा परिसरातून गौण खनिज (मुरुम) आणले होते. मंगळवारी रात्री या मुरुमाची मोजणी आणि पसरवण्याचे काम सुरू असताना, एका ढिगाऱ्यात कामगारांना मानवी शरीराचा पायाचा भाग दिसून आला. हा धक्कादायक प्रकार पाहताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली.

या घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात सदर अवयव हे एका पुरुष जातीच्या व्यक्तीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. अंधाराचा फायदा घेत गुन्हेगारांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

हा मानवी मृतदेह नेमका कोणाचा आहे?

संबंधित व्यक्तीची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मुरुमात गाडला होता का? की बोराळा येथील उत्खनन क्षेत्रातून हे अवशेष मुरुमासोबत आले आहेत? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलिसांना संशय आहे की, शरीराचे इतर भागही आजूबाजूच्या मुरुमाच्या ढिगाऱ्यात असू शकतात. त्यादृष्टीने पोलिसांनी 'सर्च ऑपरेशन' तीव्र केले असून ढिगारे उपसण्याचे काम सुरू आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT