वाशिम : वाशिम शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत की काय, असा प्रश्न आजच्या घटनेने निर्माण केला आहे. शहरातील सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेल्या 'रविवार बाजार' परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक दुकानातून अज्ञात चोरट्याने दीड ते दोन लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. ही खळबळजनक घटना १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापारी वर्गात संतापाची लाट उसळली असून सर्वत्र दहशतीचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार बाजार परिसरात नेहमीप्रमाणे ग्राहकांची मोठी गर्दी होती. सकाळी ११ वाजता दुकानांमध्ये व्यवहाराची लगबग सुरू असताना, साधारण २० ते २२ वयोगटातील एका सराईत चोरट्याने एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला लक्ष केले. दुकानदार ग्राहकांना हाताळण्यात व्यस्त असल्याची संधी साधून, या चोरट्याने काउंटरच्या आतील भागात हात साफ केला. बॅगेत अंदाजे १.५० ते २ लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इतकी मोठी रक्कम काही सेकंदात लंपास झाल्याने व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
वाशिम पोलिसांना ओपन चॅलेंज
सकाळी ११ वाजता, जेव्हा पोलीस गस्त सुरू असल्याचा दावा केला जातो, अशा वेळी वर्दळीच्या ठिकाणी ही चोरी घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. चोरटा इतका बेधडक होता की, त्याला आजूबाजूच्या लोकांची किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कोणतीही भीती वाटली नाही. दीड-दोन लाखांची बॅग घेऊन पसार होणारा हा तरुण म्हणजे पोलिसांना दिलेले 'ओपन चॅलेंज' मानले जात आहे.
सीसीटीव्हीत गुन्हेगाराचा चेहरा स्पष्ट
दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा विशीतील तरुण स्पष्टपणे कैद झाला आहे. अंगात शर्ट आणि पॅन्ट घातलेला हा तरुण आधी दुकानाची रेकी करतो आणि नंतर संधी मिळताच रोकडची बॅग घेऊन पळताना दिसत आहे. या फुटेजच्या आधारे वाशिम शहर पोलीस आता या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यासाठी शोधमोहीम राबवत आहेत.