वाशिम ,दि.११: (पुढारी वृत्तसेवा ) अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित पालक व मध्यस्थांविरोधात रिसोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील कवठा (चिखली) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सातारकर महाराज संस्थान, रिसोड येथे आयोजित करण्यात आला होता. याबाबतची माहिती चाईल्ड हेल्पलाईन १०९८, वाशिम यांना मिळताच पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विवाह सोहळा थांबवत मुलीची कागदपत्रे तपासली असता तिचे वय १५ वर्षे ५ महिने असल्याचे निष्पन्न झाले. कायदेशीर विवाहासाठी आवश्यक वयोमर्यादेपेक्षा ते कमी असल्याने ही कारवाई करण्यात आली.
यानंतर मुलीचे पालक, विवाहासाठी मध्यस्थी करणारे व संबंधित व्यक्तींविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या कलम ९, १० व ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. संबंधितांना कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे.
या कारवाईत चाईल्ड हेल्पलाईनचे सदस्य अमोल देशपांडे, सुजात खान, प्रतिभा घनसावंत, निलिमा भोंगाडे, मुख्यसेविका शुभांगी शिंदे, अंगणवाडी सेविका आम्रपाली पठाडे तसेच रिसोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी कांचन डोंगरदिवे व राजेश गांगवे यांनी सहभाग घेतला. संबंधितांचे समुपदेशन करून बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती देण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारांची माहिती तात्काळ पोलिस किंवा महिला व बालविकास विभागाला द्यावी. बालविवाहामुळे मुलांच्या शिक्षण, आरोग्य व भवितव्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे यांनी सांगितले की, बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.