वाशिम : मैत्रीपूर्ण संबंधातून घेतलेले ३ लाख रुपयांचे हातउसनवार कर्ज परत न केल्याने आणि दिलेला धनादेश बँकेत वटला नसल्याच्या प्रकरणात वाशिम येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. यू. राजपूत यांनी आरोपीला दोषी ठरवत एक महिना साधा कारावास आणि ३ लाख १० हजार रुपयांची भरपाई अशी शिक्षा सुनावली आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल २१ मे २०२६ रोजी देण्यात आला.
प्रकरणातील फिर्यादी रत्नाकर नारायण गंगावणे (रा. देपूळ) आणि आरोपी श्रीकृष्ण महादू लांभाडे (रा. वारा जहांगीर) यांची ओळख होती. मे २०१८ मध्ये आरोपीला शेतीच्या कामासाठी ३ लाख रुपयांची गरज असल्याने फिर्यादीने मैत्रीपूर्ण नात्याच्या आधारे ही रक्कम हातउसनवार दिली होती. आरोपीने दोन महिन्यांत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही रक्कम परत न मिळाल्याने फिर्यादीने वारंवार मागणी केली.
यानंतर ३० जुलै २०१८ रोजी आरोपीने फिर्यादीला ३ लाख रुपयांचा धनादेश दिला. परंतु, तो धनादेश बँकेत सादर केला असता ‘फंड्स इनसफिशिएंट’ (खात्यात पुरेशी रक्कम नसणे) या कारणाने तो बाउन्स झाला. त्यानंतरही रक्कम परत न मिळाल्याने कायदेशीर नोटीस बजावण्यात आली, मात्र आरोपीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर प्रकरण न्यायालयात गेले.
या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. अमोल उर्फ गुड्डू सोमाणी यांनी बाजू मांडली. सुनावणीदरम्यान आरोपीने चेक ‘नॉन-सीटीएस’ असल्याचा आणि तो सुरक्षेसाठी दिला होता असा बचाव केला. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत स्पष्ट केले की, चेक सीटीएस असो वा नसो, देयकाची जबाबदारी संपत नाही.
पुराव्यांच्या आधारे आरोपीने रक्कम परत न करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टच्या कलम १३८ अंतर्गत आरोपीला दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपी श्रीकृष्ण महादू लांभाडे याला एक महिना साधा कारावास आणि ३ लाख १० हजार रुपये भरपाईची शिक्षा सुनावली आहे. भरपाई न दिल्यास आरोपीला अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.