वाशीम : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत वाशीमच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई केली आहे. मंगरुळपीर येथील मंगलधाम परिसरातील हुडको कॉलनीत छापा टाकून पोलिसांनी तब्बल १९ लाख १५ हजार २०० रुपये किमतीचा ३८ किलो ३०४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, वाशीम पोलीस पूर्णपणे 'अॅक्शन मोड'वर आल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, मंगरुळपीर येथील हुडको कॉलनीत राहणारा शेख राजीक हा व्यक्ती विक्रीसाठी गांजा घेऊन आला आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी तत्काळ एका विशेष पथकाची नियुक्ती केली आणि त्यांना मंगरुळपीरला रवाना केले.
पथकाने कायदेशीर तरतुदींचे पालन करत संशयित शेख राजीकच्या घरावर छापा टाकला. झडती घेतली असता, पोलिसांना घरात ३८ किलो ३०४ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपी सोनू उर्फ शेख राजीक शेख मोहम्मद (वय २४, मूळ रा. शेलू, ता. मंगरुळपीर, सध्या रा. मंगलधाम, हुडको कॉलनी) याच्याविरुद्ध मंगरुळपीर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) अॅक्टच्या कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपीचे धागेदोरे इतर राज्यांतही असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, गांजाचा साठा त्याने कोठून आणि कसा आणला, याचा सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.
जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही तीव्र करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात अवैध गांजा विक्री सुरू असल्यास तत्काळ वाशीम नियंत्रण कक्षाला माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.