वाशिम

Washim news | शहर अतिक्रमण माफियांच्या विळख्यात...

जागा बळकावून भाड्याने देणारा ‘नवा गोरखधंदा’; राजकीय वरदहस्ताने गुंडांची चांदी...

पुढारी वृत्तसेवा

अजय ढवळे

वाशीम : शहरातील मुख्य चौक आणि सार्वजनिक व शासकीय जागांवर सर्रास अतिक्रमण करून त्या जागा खुल्या बाजारात भाड्याने देण्याचा काळा धंदा काही ठराविक राजकीय आश्रयधारक आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी उघडला आहे. अश्या कृत्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र सध्या उघडपणे दिसत आहे. हे अतिक्रमण नव्हे, तर शहराच्या छातीत खुपसलेला खंजीर आहे.

फूटपाथ, रस्ते, नाल्यालगतच्या जागा, मोकळे भूखंड काहीच शिल्लक ठेवलेले नाही. बिनधास्त अतिक्रमण, त्यावर पत्र्याच्या शेड, दुकाने, गोडाऊन उभे करून दरमहा हजारो नव्हे तर लाखोंचे भाडे वसूल केले जात आहे. आणि हे सगळं घडत असताना वाशीम नगरपालिका, पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग झोपेचं सोंग घेत आहेत, की मुद्दाम डोळेझाक करत आहेत? हा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.

सामान्य नागरिकाने दोन फूट जागा ओलांडली तर दंड, नोटीस आणि नगर परिषदेची तत्पर कारवाई होते, पण राजकीय आशीर्वाद असलेल्यांनी संपूर्ण जागाच गिळंकृत केली तरी कारवाई शून्य! म्हणजे कायदा फक्त गरिबांसाठीच आहे का? की अतिक्रमण माफियांसाठी शहर खुले चारागृह बनले आहे? नागरिकांचा आरोप आहे की, हप्ते वेळेवर पोहोचतात म्हणून कारवाई थांबते, आणि एखादा अधिकारी आवाज उठवू पाहिला तर त्याची तात्काळ बदली किंवा दबाव टाकला जातो. हे प्रशासन आहे की अतिक्रमन माफियांचे बाहुले? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी, अपघात, गुन्हेगारी वाढ, अग्निसुरक्षेचा प्रश्न आणि शहराच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. तरीही जबाबदार लोक गप्प का? कोणाच्या आशीर्वादाने हे माफिये खुलेआम शहरात राज्य करत आहेत? कोण अधिकारी, कोण नेता त्यांना संरक्षण देतोय? आता संयमाचा बांध तुटत आहे. जर तात्काळ अतिक्रमण माफियांवर कठोर कारवाई झाली नाही, तर शहरात रस्त्यावर उतरून जनआंदोलन, घेराव आणि थेट संघर्ष अटळ असल्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT