वाशिम : शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने नगर परिषदेकडून हाती घेण्यात आलेली सौंदर्यीकरणाची विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत. शहराला आधुनिक आणि आकर्षक स्वरूप देण्याच्या उद्देशाने नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा अभियंता अनिल केंदळे यांच्या संकल्पनेतून ही कामे केली जात आहेत.
यामध्ये टेम्पल गार्डन, महात्मा फुले सांस्कृतिक भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, आणि छत्रपती शिवाजी महाराज अकोला नाका चौक येथील पुतळ्यांच्या कंपाउंडचे काम यासह शहरातील विविध प्रमुख चौकांचे सुशोभीकरण, रस्त्यांची सुधारणा, आकर्षक विद्युत रोषणाई, वृक्षारोपण तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या सुशोभीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत.
नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त शहर उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेकडून नियोजनबद्ध पद्धतीने विकासकामे राबविण्यात येत आहेत. अनेक प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचले असून, लवकरच शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे. या कामांमुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.