Washim Rukhmini Jewellers Case
वाशिम : शहरातील रविवार बाजार परिसरातील रुख्मिणी ज्वेलर्सविरुद्ध अवैध सावकारी व्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैध सावकारी परवाना नसताना सावकारीचा व्यवसाय केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील कलम ३९ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सहकार विभागाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
अवैध सावकारी व्यवहाराबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सहकार विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने १६ एप्रिल रोजी शहरातील बालाजी कॉम्प्लेक्समधील रुख्मिणी ज्वेलर्स येथे झडती घेतली. या कारवाईदरम्यान संबंधित ज्वेलर्सकडे सावकारी व्यवसायासाठी आवश्यक असलेला वैध परवाना नसल्याचे आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच परवाना नसतानाही सावकारी व्यवहार सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी वाशिम शहर पोलिस ठाण्यात ४ सप्टेंबररोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या कारवाईची माहिती समोर आल्यानंतर शहरातील सराफा बाजारात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांबाबत नागरिकांना काही माहिती असल्यास ती सहकार विभागाकडे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम एम. एस. लटपटे यांनी दिली.
अवैध सावकारीच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्यास संबंधितांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहनही सहकार विभागाने केले आहे.