Accident Pudhari
वाशिम

Washim Accident : कारच्या धडकेत दीडवर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

आई-वडील गंभीर जखमी; वाशिम-मालेगाव मार्गावरील सावरगाव बर्डे नजीकची घटना

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : वाशिम-मालेगाव मार्गावरील सावरगाव बर्डे नजीक गुरुवारी (दि. ३०) दुपारी २ वाजताच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दीडवर्षीय चिमुकला विराज साबळे याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे आई-वडील श्रावण साबळे आणि कृतीका साबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मेहकर तालुक्यातील कोयाळी येथील रहिवासी श्रावण साबळे हे पत्नी कृतीका आणि मुलगा विराज यांच्यासह दुचाकीने मालेगावच्या दिशेने जात होते. दरम्यान, सावरगाव बर्डे नजीक पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. मात्र, या अपघातात चिमुकल्या विराजचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त कारसह चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT