Washim Bribe 
वाशिम

Washim Bribe | 'आदर्श' गावाचा सरपंच 'भ्रष्ट'! मालेगावच्या ढोरखेडा येथील महिला सरपंचाला २५ हजारांच्या लाचेसह एसीबीने ठोकल्या बेड्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ढोरखेडा ‘आर्दश गाव’

पुढारी वृत्तसेवा

अजय ढवळे

वाशिम : एकीकडे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत गावाला 'आदर्श' म्हणून गौरवण्याची प्रक्रिया सुरू होती, तर दुसरीकडे त्याच आदर्श ग्रामपंचायतीची सरपंच भ्रष्टाचाराच्या दलदलीत हात धुवून घेत होती. मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील सरपंच सुनीता दत्तात्रय उर्फ बबन मिटकरी यांना ४ जून २०२६ रोजी दुपारी ४ वाजता, २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाशिम एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) च्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईने आदर्श ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या वास्तवावर प्रकाश टाकला आहे.

ढोरखेडा ग्रामपंचायतीमध्ये अंदाजे ४.५ लाख रुपयांचे नाली बांधकामाचे बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात सरपंच सुनीता दत्तात्रय उर्फ बबन मिटकरी यांनी १० टक्के लाचेची मागणी केली होती. गोपनीय माहितीनुसार ही मागणी त्यांच्या पतीने केलेली असावी असा अंदाज आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराची धावपळ सुरू असताना अखेर २५ हजार रुपयांवर तडजोड झाली. तक्रारदाराने याबाबत वाशिम एसीबीकडे धाव घेतली होती.

३ जून रोजी एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी स्पष्ट झाली आणि ४ जून रोजी सापळा रचून सरपंच मिटकरी यांना लाचेची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली.

या घटनेने प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे, ज्या दिवशी एसीबीने या प्रकरणाची पडताळणी (३ जून) केली, त्याच काळात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील एक चमू ढोरखेडा येथे कामकाजाची तपासणी करत होती. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे या गावाला 'आदर्श'चा दर्जा देऊन तपासणी केली जात होती. एका बाजूला गावाच्या विकासाचे 'आदर्श' मोजमाप सुरू होते, तर दुसरीकडे सरपंच भ्रष्टाचारात मग्न होत्या, हा किती मोठा विरोधाभास आहे!

"आदर्श सरपंच" म्हणून मिरवणाऱ्यांनी जनतेच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणे, हे कोणत्या विकासाचे आदर्श आहेत? प्रशासनाने दिलेला हा पुरस्कार की भ्रष्टाचाराची पोचपावती? हा प्रश्न आता ढोरखेडा ग्रामस्थ आणि सर्वसामान्य जनता विचारत आहे. हा भ्रष्टाचार केवळ एक गुन्हेगारी कृत्य नसून, गावाच्या विकासाच्या नावावर गोरगरिबांच्या स्वप्नांशी केलेला विश्वासघात आहे.

जेव्हा सत्तेच्या खुर्चीवर बसलेले लोकच 'आदर्श'च्या नावाखाली लाचखोरी करत असतील, तर सामान्यांनी न्याय मागावा तरी कोणाकडे? या घटनेने ढोरखेडाच्या विकासाच्या दाव्यातील फोलपणा उघड केला असून, भ्रष्टाचाराच्या या 'आदर्शा'चे डोळ्यात अंजन घालणारे वास्तव समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT