वाशीम : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) आज राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेत अकोल्यातून एका संशयिताला ताब्यात घेतल्याने विदर्भात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेला हा तरुण मूळचा वाशिम जिल्ह्याचा असून तो अकोल्यात वास्तव्यास होता.
गेल्या अनेक दिवसांपासून एटीएसच्या रडारवर असलेल्या या संशयित तरुणाच्या ठिकाणावर आज पहाटे पथकाने छापा टाकला. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या टोळीशी हा तरुण संपर्कात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
वाशिमचे कनेक्शन : ताब्यात घेतलेला संशयित मूळचा वाशिम येथील रहिवासी असून, तो कामाच्या निमित्ताने किंवा अन्य कारणाने अकोल्यात राहत होता. पाकिस्तानी गुन्हेगारी टोळ्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सना फॉलो करणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे, अशा संशयास्पद हालचालींमुळे एटीएस या तरुणाच्या मागावर होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव एटीएसने या संशयिताचे नाव आणि अकोल्यातील नेमका पत्ता अद्याप गोपनीय ठेवला आहे.
केवळ अकोलाच नव्हे, तर चंद्रपूर आणि नागपूर या भागांतही एटीएसची पथके सक्रिय झाली आहेत. पुसदमध्ये यापूर्वी झालेल्या काही कारवायांच्या पार्श्वभूमीवर, अकोला आणि वाशिममधील या नवीन कनेक्शनमुळे यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
"अकोल्यातून ताब्यात घेतलेल्या या तरुणाची कसून चौकशी सुरू असून, वाशिममध्ये त्याचे काही साथीदार आहेत का? किंवा विदर्भात या टोळीचे जाळे कोठपर्यंत पसरले आहे? याचा शोध आता एटीएस घेत आहे." या कारवाईमुळे अकोला आणि वाशिम जिल्ह्यात चर्चेला उधाण आले असून, सीमावर्ती भागातील संशयास्पद हालचालींवर पोलीस प्रशासन आता बारीक लक्ष ठेवून आहे.