वाशिम: पुढारी वृत्तसेवा : मंगरूपीर तालुक्यातील कोठारी येथील शेत मजूर बुधवारी (दि. 24) सायंकाळी शेतातून परत येताना नाल्याच्या पुरात वाहून गेला होता. मारोती नारायण डाखोरे (वय 36) असे मजुराचे नाव आहे. त्याचा मृतदेह आज (दि. 25) सकाळी सापडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मारोती डाखोरे गाव तलावालगतच्या रस्त्याने बकऱ्यांना चारा आणण्यासाठी गेला होता. परत येताना गाव नाल्याला पूर आल्याने व त्याला पुराचा अंदाज न आल्याने तो परत येताना पुरात वाहुन गेला. गावातील लोकांनी शोध घेतला. परंतु नाल्याद्वारे गाव तलावात वाहुन गेल्याने व रात्री अंधार झाल्याने काल त्याचा शोध झाला नाही.
आज पींजर येथील आपातकालीन शोध पथकाने गाव तलावातून मारोती याचा मृतदेह शोधन काढला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा व आई -वडील असा परिवार आहे. डाखोरे कुटुंबावर व कोठारी गावावर शोककळा पसरली आहे.