Accident pudhari photo
वाशिम

Washim Accident | वाशिम-हिंगोली महामार्गावर भीषण अपघात : दोन चिमुकल्यांसह वडिलांचा जागीच मृत्यू, आई गंभीर

अधिक मासाचे जेवण करून परतताना काळाचा घाला; देवठाणा जवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : अधिक मासाच्या धोंड्याच्या जेवणाचा आनंद घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या एका सुखी कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. वाशिम-हिंगोली महामार्गावरील देवठाणा फाट्याजवळ एका मद्यधुंद पिकअप चालकाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या हृदयद्रावक अपघातात दोन चिमुकल्या मुलींसह त्यांच्या वडिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. हा अपघात २६ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर खडसे (वय ३०) हे आपल्या कुटुंबासह मालेगाव येथे आपल्या साडूभाऊंकडे अधिक मासाचे धोंडे जेवण (धोंड्याचा कार्यक्रम) करण्यासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते अत्यंत आनंदाने आपल्या दुचाकीवरून गावी परतत होते. मात्र, वाशिम ते कनेरगाव नाका रोडवरील देवठाणा मार्गावर मागून येणाऱ्या एका भरधाव बोलेरो पिकअपच्या चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील ज्ञानेश्वर खडसे आणि त्यांच्या दोन निष्पाप मुली केतकी (वय ७ वर्ष) व कीर्ती (वय ३ वर्ष) या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. काही वेळापूर्वी ज्या चिमुकल्यांच्या गाडीवर हसण्या-खिदळण्याचा आवाज होता. त्या काही क्षणातच शांत झाल्या. या अपघातात ज्ञानेश्वर यांच्या पत्नी वैशाली ज्ञानेश्वर खडसे (वय २५) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने वाशिम येथील क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, बोलेरो पिकअपचा चालक हा प्रचंड मद्यधुंद अवस्थेत होता आणि तो गाडी अत्यंत भरधाव वेगाने चालवत होता. त्याच्या याच बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा क्षणात अंत झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

हृदय पिळवटून टाकणारी घटना...

 एकाच वेळी पती आणि दोन पोटच्या गोळ्यांसारख्या चिमुकल्या मुली गमावलेल्या त्या माउलीला (वैशाली खडसे) अजून या घटनेची पूर्ण कल्पनाही नसेल. ती स्वतः हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. या भीषण अपघातामुळे खडसे कुटुंबावर आणि त्यांच्या गावावर शोककळा पसरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT